अमेरिकन उत्पादकांचे हित जपण्यासाठी अमेरिका पोलाद आणि अॅल्युमिनियमवर आयात कर लादणार असल्याची घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. यामुळे आगामी काळात अमेरिकेचे चीन आणि युरोपबरोबर व्यापारयुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे.. या निर्णयामुळे अमेरिकेतील रोजगारात वाढ होण्याचा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.
ट्रम्प यांनी पोलादावर 25 टक्के तर अॅल्युमिनियमवर 10टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय लवकरच अंमलात आणला जाणार असल्याचे जाहीर केले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहयोगी होप हिक्स यांनी व्हाईट हाऊसच्या संपर्क संचालकपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेच्या प्रवक्त्या आणि जानेवारी 2017 पासून त्या संपर्क संचालक म्हणून कार्यरत आहेत.
2016 मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाच्या आरोपात ‘हाऊस इंटेलिजेंस कमेटी’च्या समोर हजर झाल्यानंतर एक दिवसानंतरच त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे.
खलिस्तानी दहशतवादी जसपाल अटवाल याला कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदेऊ यांच्या भारत दौ-यातील भोजन समारंभास दिल्या गेलेल्या निमंत्रणावरून कॅनडाच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. विरोधक भारताच्या ऐक्याचा आणि खलिस्तानी फुटीरवाद्यांचा निषेध करणारा प्रस्ताव मांडणार आहेत.
कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते अॅन्ड्रु शीर त्रुदेऊ म्हणाले की, खलिस्तानी फुटीरवाद्यांचा निषेध करणारा आणि भारताच्या ऐक्याला पाठिंबा देणारा प्रस्ताव विरोधी पक्ष संसदेत मांडणार आहे.
फेब्रुवारी 2017 मध्ये अमेरिकेतील कन्सास शहरात श्रीनिवास कुचीभोतला या भारतीय अभियंत्याची हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणातील आरोपी अॅडम पुरिन्टनने न्यायालयात गुन्हा मान्य केला आहे. अॅडमने गुन्हा मान्य केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आहे. आता अॅडमला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता आहे.