बहुचर्चित कावेरी पाणीवाटप प्रश्नावरुन सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला. कावेरी नदीवर कोणत्याही राज्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
तसेच कावेरी नदीतून तामिळनाडूला मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात केली आहे.मात्र, दुसरीकडे कर्नाटक राज्याचा पाण्याचा वाटा वाढवण्यात आला आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याचे काम केंद्र सरकार करणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले.
म्यानमारमधून ईशान्य भारतात होणारी रोहिंग्या मुस्लिमांची घुसखोरी रोखण्यासाठी मिझोराम-म्यानमार सीमेवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याची विनंती मिझोरामचे मंत्री लाल तान्हेवाला यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना केली.
भारताने 20 फेब्रुवारी रोजीअग्नी 2 या अण्वस्त्र वाहण्याची क्षमता असलेल्या मध्यम वर्गात मोडणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ओदिशामधल्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेण्यात आली.
अग्नी 2 क्षेपणास्त्र 20 मीटर लांबीचे असून त्याचे वजन 17 टन आहे. तसेच एक टन इतकी वहनक्षमता असलेल्या अग्नी 2 चा माऱ्याचा पल्ला दोन हजार किमी इतका आहे.
भारताचे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन किंवा डीआरडीओनं विकसित केलेल्या अग्नी या सीरीजमधलंच हे क्षेपणास्त्र आहे. या सीरीजमध्ये अग्नी 1 (700 किमीचा पल्ला), अग्नी 3 (3000 किमीचा पल्ला), अग्नी 4 (4000 किमीचा पल्ला) व अग्नी 5 (5000 किमीपेक्षा जाल्त पल्ला) यांचा समावेश आहे.
जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि समाजाप्रती आपली जबाबदारी जाणणाऱ्या भारतीय वंशाच्या दोन अमेरिकन संशोधकांची अमेरिकेमधील व्हर्जिनियातील नामांकित विज्ञान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी अरुण जे. सन्याल आणि 18 वर्षीय पार्थिक नायडू यांच्यासह एकूण सहाजणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम यांनी 2018च्या आऊटस्टॅंडिग स्टेम (STEM) पुरस्करांसाठी ही नावे निवडली आहेत. स्टेम (STEM) म्हणजेच, विज्ञान (science), तंत्रज्ञान (technology), अभियांत्रिकी (engineering) आणि गणित (mathematics).
पुरस्कारासाठी निवड झालेल्या सन्याल यांनी यकृत रोग निदान आणि उपचार प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केले आहेत. तर, 18वर्षीय पार्थिक नायडूने कर्करोगाच्या 3-डी इंटरॅक्शनचा अभ्यास करणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून ‘चांद्रयान-2’ या भारताच्या महत्त्वाकांक्षी यानाचे एप्रिल महिन्यात प्रक्षेपण होईल, या मोहीमेसाठी 800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे हॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांपेक्षाही हा खर्च कितीतरी पटींनी कमी आहे. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांपेक्षा ‘चांद्रयान-2’ मोहीमेचा खर्च कैक पटींनी कमी आहे.
भारताची ही दुसरी चांद्रमोहीम असून आजवर फारसे संशोधन न झालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील प्रदेशात ते उतरवण्याचे उद्दिष्ट आहे.
इस्रोचे नवनियुक्त अध्यक्ष के. सिवन.
चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणासाठी एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यानचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. एप्रिलमधील प्रक्षेपण यशस्वी झाले नाही तर नोव्हेंबरमध्ये पुन्हा प्रयत्न केला जाईल.
चांद्रयान-1 ने चंद्रावरील पाण्याचा शोध लावला होता.