चालू घडामोडी 2 & 3 एप्रिल 2018

  • सध्या वापरात नसलेले, अनियंत्रितपणे अवकाशात भ्रमण करत असलेले चीनचे अंतराळस्थानक (स्पेस लॅब) भारतात कोठेही कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर हा धोका टळला असून, ही स्पेस लॅब दक्षिण प्रशांत महासागरात कोसळल्याची माहिती चीनच्या वैज्ञानिकांनी दिली आहे.
  • या स्पेस लॅबने रविवारी सायंकाळी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला .यापूर्वी ती लॅब ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत कोठेही कोसळू शकते, अशी शक्‍यता चीनच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली होती. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई व महाराष्ट्रात कोठेही ही लॅब कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
  • 'तियांगोंग-1' असे या अंतराळ स्थानकाचे नाव असून, त्याला चीनमध्ये "स्वर्गातील महाल' असेही संबोधले जाते. हे अंतराळ स्थानक रविवारी दुपारी पृथ्वीच्या वातावरणापासून सुमारे 179 किलोमीटर अंतरावर होते.दोन वर्षांच्या नियोजित सेवेनंतर 2013मध्ये या अंतराळ स्थानकाचा वापर थांबविण्यात आला होता.
  • याआधी अंतराळयानाशी संबंधित घटना
    1. 1967- सोयुझ 1 या अंतराळयानाचा पॅराशूट न उघडल्यामुळे एका अंतराळवीराचा यामध्ये मृत्यू झाला.
    2. 1986- STS-51-L थंड वातावरणामुळे अवघ्या 73 सेकंदातच हे अंतराळयान भरकटले आणि मोठा स्फोट झाला. यामध्ये सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. महत्त्वाचे म्हणजे अंतराळयानाचा अर्धा भाग आजतागायत सापडलेला नाही.
    3. 2003-04- कोलंबिया अंतराळयान दोन आठवड्याच्या मिशननंतर परतीच्या मार्गावर थर्मल प्रोटेक्‍शन सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला.
  • दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अब्रुनुकसान प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. केजरीवाल यांनी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये 13 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून अरुण जेटलींवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जेटलींनी केजरीवाल यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.
  • मात्र, केजरीवाल यांनी अरुण जेटली आणि त्यांच्या कुटुंबीयांची जाहीर माफी मागितली. त्यामुळे या प्रकरणावर पदडा पडला असून, केजरीवाल निर्दोष झाले आहेत.
  • प्रत्यक्ष करदात्यांच्या संख्येत यंदा तब्बल एक कोटीने वाढ झाल्याचे प्राप्तिकर खात्याने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. प्रत्यक्ष करभरणेमध्येही लक्षणीय वाढ झाली असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
  • 2017-18 या आर्थिक वर्षासाठी 6.8 कोटी करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्रे (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरले आहे. गेल्या आर्थिक वर्षात 5.4 कोटी 'रिटर्न्स' दाखल झाली होती. प्राप्तिकर भरणाऱ्यांच्या संख्येत गेल्या चार वर्षांत सातत्याने वाढ होत असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
  • संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने दहशतवाद्यांची यादी जाहिर केली आहे. यात 139 दहशतवादी हा पाकिस्तानातील असून, सर्वाधिक हे लष्करे तैयबा व जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचे आहेत.
  • सिगारेटच्या पाकीटावरही ती ओढणे 2Aprilआरोग्यासाठी हानिकारक असते असे लिहीलेले असते. ज्यांना सिगारेट आणि तंबाखूचे व्यसन आहे त्यांच्यासाठी आता या उत्पादनांवर 1800-11-2356 हा टोल फ्री क्रमांक दिला जाणार आहे. या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास व्यक्तीचे मोफत समुपदेशन केले जाणार आहे.
  • याबरोबरच सिगारेट आणि तंबाखूच्या पाकीटावरील 85 टक्के भागात हे व्यसन वाईट आहे हे दाखविणारे एक प्रतिकात्मक छायाचित्रही देण्यात येणार आहे. या चित्राचाही व्यसन सोडायचे असणाऱ्यांना सकारात्मक उपयोग होईल असा अंदाज आहे. तसेच यावर काही प्रबोधनात्मक संदेशही देण्यात आले आहेत. तंबाखू हे मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण आहे, तंबाखूमुळे कर्करोग होऊ शकतो असे हे संदेश आहेत. हे सगळे बदल येत्या सप्टेंबर महिन्यापासून लागू होणार असून संबंधित कंपन्यांना त्याप्रमाणे सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.